Wednesday, October 14, 2009

मराठी चित्रपटात प्रथमच फेरारी! 23rd Sept 2009 [Loksatta; Mumbai Vruttanta]

यश चोप्रश्न किंवा करण जोहर बॅनरच्या चित्रपटांतील नायकाच्या उत्पन्नाचा स्रोत कळत नाही, पण त्याच्याकडे असलेला गाडय़ांचा ताफा मात्र डोळ्यात भरण्यासारखा असतो. हिंदी चित्रपटांमध्ये सर्रास दिसणारी श्रीमंती आणि ग्लॅमर मराठीत फारसे दिसून येत नाही. येथील नायक हा मध्यमवर्गीय किंवा गावाकडील असतो. श्रीमंतीचा बडेजाव दाखविणारी व्यक्तिरेखा मराठीत अभावानेच दिसते. ही चाकोरी मोडून काढणाऱ्या सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘गैर’ या चित्रपटात ‘फेरारी’, ‘मर्सिडिज’, ‘जॅग्वार’, ‘लेक्सस’, ‘ऑडी’ या गाडय़ा पाहायला मिळणार आहेत. चित्रपटातील बिझनेस टायकूनची व्यक्तिरेखा साकारलेल्या संदीप कुलकर्णीची एन्ट्रीट ‘फेरारी’मधून झाली आहे.
‘फेरारी’ चालविण्याची संदीपची ही पहिलीच वेळ. त्यामुळे ‘फेरारी’ पहिल्यांदा चालवली तो दिवस संदीपला आजही स्पष्ट आठवतो. संदीप म्हणाला की, दिवसभराच्या चित्रीकरणानंतर संध्याकाळी मी फेरारी चालवितानाचे दृश्य चित्रीत होणार होते. मी संध्याकाळची आतुरतेने वाट पाहात होतो. प्रकाश कमी असल्यामुळे त्या दिवशी हे दृश्य चित्रीत होईल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. पण अखेर ते दृश्य ठरलेल्या वेळी चित्रीत झाले. ‘फेरारी’चा आवाज आणि वेग दोन्हीही वेड लावणारा आहे. दुसऱ्या गिअरलाच गाडीचा वेग इतका वाढतो की त्यापुढचा गिअर टाकायचा असेल तर मोठी धावपट्टीच हवी. मी ‘फेरारी’त असताना माझ्या सहकलाकारांना माझा हेवा वाटत होता, असेही तो मिश्किलपणे म्हणाला.

चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी सांगितले की, या चित्रपटाचे बजेट साधारण दीड ते पावणे दोन कोटी रुपयांच्या आसपास आहे. कथानकाची गरज म्हणूनच या सर्व गाडय़ा चित्रपटात वापरण्यात आल्या आहेत. केवळ गाडय़ाच नव्हे तर प्रत्येक व्यक्तिरेखेच्या कपडय़ांपासून ते मोबाइल फोनच्या रिंगटोनपर्यंत प्रत्येक गोष्ट बारकाईने निश्चित करण्यात आली आहे. चित्रपटाचा ‘लूक’ श्रीमंतीचा असल्यामुळे कथानकासाठी या गाडय़ांची आवश्यकताही होती. या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते संजय घोडावत यांच्या ताफ्यात या सर्व गाडय़ा आहेत. निर्माते संतोष नवले, हसमुख हिरानी आणि जी. प्रशांत यांच्या सहकार्यामुळे कोणतीही तडजोड न करता चित्रपट पूर्ण करण्यात आला. राजवाडे यांनी सांगितले की, ‘मी शिवाजीराजे भोसले..’ किंवा ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ इत्यादी चित्रपटांनी दाखवून दिले आहे की, योग्य प्रकारे पैसा वापरला गेला तर चित्रपटाला व्यावसायिक यशही मिळू शकते. त्यामुळे सध्या निर्मात्यांचा मराठी चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला आहे. ‘गैर’ या चित्रपटात अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित, इला भाटे, उदय टीकेकर, अमिता खोपकर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा थरारपट नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात प्रदर्शित होणार आहे.


Source: http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=10002:2009-09-22-12-48-38&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81

No comments:

Post a Comment