Tuesday, October 27, 2009

स्टायलबाज गैर.. स्पृहा जोशी [Loksatta; Mumbai Vruttanata] 28th Oct 2009

प्रेक्षक आणि समीक्षक यांना जिंकून घेणारे ‘मृगजळ’, ‘एक डाव धोबी पछाड’सारखे चित्रपट आणि ‘असंभव’, ‘अग्निहोत्र’सारख्या मालिकांचा दिग्दर्शक सतीश राजवाडे याची वेगळी ओळख करून द्यायलाच नको. त्याच्या कामातील ताजेपणा, स्टाइल आणि डॅशिंग व्यक्तिमत्व यामुळे आजची अवघी तरुणाई सतीशची फॅन आहे. त्याने दिग्दर्शित केलेला ‘गैर’ हा बिग बजेट चित्रपट लवकरच रिलीज होत आहे. त्यानिमित्ताने सतीश सोबत केलेल्या या मनमोकळया गप्पा.
‘गैर’चं वैशिष्टय़ काय सांगशील?
आजचा विषय, तरुणाईला भावणारी स्टाइल, थ्रिल, अ‍ॅक्शन आणि संगीत हे ‘गैर’चे सगळ्यात मोठे वैशिष्टय़. ‘दिल चाहता हैं’ जशी हिंदीतील ‘कल्ट फिल्म’ ठरली, त्याचप्रमाणे ‘गैर’ ही मराठीतील ‘कल्ट फिल्म’ ठरेल असे मला वाटते. कारण त्यानुसारच या फिल्मचे स्टायलिंग केलेले आहे.
आपले मराठी हीरो हे हिंदी चित्रपटांत नोकर, विनोदी अभिनेते, फारफारतर हिरोचा मित्र अशा दुय्यम भूमिकांमध्येच का दिसतात? कोणाबद्दलही कुठल्याही प्रकारचा अनादर
अजिबातच मनात नाही. पण जास्त क्षमता असूनही आपण मागे का राहतो? आधी मुळात हीरो सारखे त्यांना प्रेझेन्ट केले जाते का? असे प्रश्न मला नेहमी सतावतात. ‘गैर’मधून मी हाच समज बदलण्याचा प्रयत्न करतोय. मराठीमध्ये ही एका नवीन ट्रेण्डची सुरुवात आहे, असे मला वाटते. कलाकारांचे कॉश्चुम्स, अगदी त्यांच्या शूजपासून ते गॉगल्सपर्यंत प्रत्येक गोष्ट खास स्टाइल्ड आहे आणि आज आपल्या फिल्म्सना अशा स्टाइलचीच सगळ्यात जास्त गरज आहे.
फिल्म करताना कुठल्या प्रेक्षकवर्गाला खास डोळ्यासमोर ठेवले होते का?
नाही. खास प्रेक्षकवर्ग असा डोळ्यासमोर नव्हता. पण नेहमीच्या मध्यमवयीन प्रेक्षकांसोबत तरुणवर्ग माझ्या फिल्मकडे कसा वळेल, याबाबत मी खूप विचार केला होता. मराठी चित्रपटांकडे उत्तम विषय, दर्जेदार अभिनय हे सगळे असूनही प्रेक्षकवर्ग केवळ ‘४० वर्षापुढे’ असा सीमित का राहतोय? काय आणि कुठे कमी पडत आहे, ज्यामुळे तरुण याकडे पाठ फिरवतात? याचे उत्तर आहे प्रेझेन्टेशन, स्टाइल, थ्रिल. हे दिसतच नाही. कौटुंबिक सिनेमा आणि थ्रिलर यात तरुण अर्थातच थ्रिलर पाहणे पसंत करतात. म्हणूनच उत्तम कथाविषय असलेला थ्रिलर सिनेमा बनविण्याचे मी निश्चित केले. मला खात्री आहे की जेव्हा हिंदी चित्रपटांसोबत मल्टिप्लेक्समध्ये ‘गैर’ प्रदर्शित होईल, तेव्हा मराठी सिनेमाकडे पाठ फिरवणारा तरुणवर्ग ‘गैर’चा लूक पाहून स्वत:हून हा चित्रपट पहायला जाईल.
या चित्रपटाला एक यंग लूक यावा किंवा तरुणांनी स्वत:ला चित्रपटातील भूमिकांशी रिलेट करावे यासाठी काही खास प्रयत्न केले आहेत का?
नक्कीच. प्रत्येकाचा एक वेगळ्या स्टाइलचा वॉर्डरोब आहे. ही फिल्म कॉलेज गोअर्ससाठीही आहे.त्यांना आकर्षित करणारी रंगसंगती, वातावरणातील ताजेपणा यांकडे विशेष लक्ष दिले आहे. संदीप कुलकर्णी, अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित हे सर्वानाच आवडतील असे कलाकार आहेत. त्यामुळे ‘ग्लॅमर कोशन्ट’ आहेच. त्यांनी अप्रतिम काम केले आहे. ‘गैर’च्या निमित्ताने माझ्याकडे दर्जेदार अभिनय आणि ग्लॅमर असा योग जुळून आला आहे. त्यामुळे मला खात्री आहे की तरुणवर्गाला हा प्रयोग नक्की भावेल.
आपण लक्ष देऊन पाहिले तर आतापर्यंत मराठी चित्रपटांचा फोकस हा साहित्यमूल्य, नैतिकता, संस्कार असा राहिला आहे. एखादा संदेश देणारे चित्रपट आपल्याकडे बनतात. यात वाईट काहीच नाही. कमी पडतेय ती विषय मांडण्याची पद्धत. ती एकसुरी झाल्यामुळे तरुणवर्ग स्वत:ला त्यांच्याशी रिलेट करू शकत नाही आणि त्यामुळेच आवडीने मराठी चित्रपटही पाहात नाहीत. ‘गैर’ची निर्मिती करताना मी हे भान सतत ठेवले होते. त्यामुळेच तरुणांना तो ‘त्यांचा’ चित्रपट वाटेल.
बऱ्याचदा तरुण मुले स्टाइलवर भाळताना विषयाकडे दुर्लक्ष करतात. त्यांची ही आवड चुकीची आहे असे वाटते का?
नाही. कारण मुळात आजकालची मुले विषयाकडे लक्ष देत नाहीत, हेच मला मान्य नाही. ती अतिशय जागरूक आहेत. फक्त त्यांचे म्हणणे आहे की, ते आमच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवा. ही मागणी अगदीच योग्य आहे. बदलत्या काळानुसार विषय मांडण्याची पद्धत बदललीच पाहिजे. साधे उदाहरण सांगतो. १५ वर्षापूर्वीची फियाट आपण आजही आवडीने का वापरत नाही? मारुती, एस्टीम, झेन, सँट्रो, पॅलिओ असा बदल घडलाच ना. चित्रपटांचेही तसेच आहे. नवीन तंत्र, नवीन स्टाइल बदलत्या पिढीनुसार जर बदलत नसतील, तर आजच्या पिढीला ते कसे बघावसे वाटेल? आधी काय धडून गेले आहे आणि पुढे काय घडू शकेल याची वर्तमानाशी सांगड घातली, तर नक्कीच तरुण पिढीही त्याला मस्त प्रतिसाद देईल.
‘गैर’ करताना एक दिग्दर्शक म्हणून सर्वाधिक चॅलेंजिंग तुला काय वाटले होते?
‘गैर’ हा एक क्राईम थ्रिलर आहे. प्रत्येक पात्र एकमेकांत गुंफले गेले आहे. ‘अ‍ॅक्शन’पेक्षा ‘रिअ‍ॅक्शन’वरती सगळा चित्रपट बांधलाय. क्राईम थ्रिलरच्या वेगवान हाताळणीमध्ये एकही क्षण प्रेक्षकांना सिनेमा थांबल्यासारखा वाटू नये, हे अतिशय आव्हानात्मक होते. तसेच या ‘टेक्श्चर’चा चित्रपट मराठीतही होऊ शकतो हे आपल्या प्रेक्षकांना पटवून देणे हे आव्हान ‘गैर’ करताना होत.
एकांकिका स्पर्धामध्ये तू परीक्षक होतास, तेव्हा नवीन तरुणांचे काम बधून कसे वाटले?
या तरुणांचे भविष्य उज्ज्वल आहे. फक्त थोडासा पेशन्स कमी पडतोय. या क्षेत्रात काही करुन दाखवायचे असेल, तर ‘पेशन्स इज द की’. एका राक्षीत काहीच मिळत नाही. पण ज्या कल्पना आणि अप्रतिम सादरीकरण दिसून येत आहे, त्यावरून ‘फ्युचर इज रिअली ब्राईट’ असे मी नक्कीच म्हणू शकतो. एकांकिकांचे दिग्दर्शक, अभिनेते पॉलिश्ड होत आहेत, व्यावसायिक दर्जाचे काम करीत आहेत आणि त्यांच्यासोबत काम करायला मिळते, याचा मला आनंद आहे.
‘गैर’चे रिलीज जवळ आले असताना नेमके काय वाटतय?
नेहमीप्रमाणेच प्रत्येक रिलीजच्या आधी असते तसेच.. या फिल्मसाठी माझ्या निर्मात्यांपासून ते तंत्रज्ञांपर्यंत आणि अभिनेत्यांपासून माझ्या संपूर्ण टीमपर्यंत प्रत्येकानेच जीव तोडून मेहनत केली आहे. खूप मनापासून, प्रश्नमाणिकपणे केलेला प्रयत्न आहे. त्यामुळे सर्वाना माझी विनंती आहे की गैर आवर्जून पहा. सिनेमा आवडला तर कौतुक करायला आणि नाही आवडला तर स्पष्ट तसे सांगायला संकोच करु नका.

No comments:

Post a Comment